मुंबई :- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते. पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य संतोष दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नसताना लाभ मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
कृषी मंत्री सत्तार म्हणाले की, विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील पीक अर्जदार शेतकऱ्यांची प्रत्यक्ष फळबाग तपासणी करण्यात आली. यामध्ये 14 मार्च अखेर एकूण 2 लाख 48 हजार 926 पीक विमा अर्जदारांपैकी 83,341 अर्जांची क्षेत्रीय तपासणी झाली आहे. यापैकी 7,265 अर्जदारांनी विमा घेतलेले फळ पीक घेतलेले नाही. यामुळे यांना फळ पीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात येईल.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात एकूण 47 हजार 686 शेतकऱ्यांनी 37,886.91 हेक्टर क्षेत्रावर विमा संरक्षण घेतले आहे. 14 मार्च 2023 अखेर 18 हजार 675 अर्जांची तपासणी झाली असून त्यात 2 हजार 450 शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर फळबाग आढळून आलेली नसल्याचे मंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितले.