मनपाची निवडणूक जिंकून येण्याची लायकी नसलेल्या लोंढेंनी देवेंद्र फडणवीस बद्दल बोलू नये : अॅड धर्मपाल मेश्राम
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वक्तव्याचा घेतला समाचार
नागपूर, ता. २९ : देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम मतदार संघाचे नेतृत्व करताना स्वत:च्या मतदार संघातील जनतेसह विदर्भातील जनतेची प्रतारणा करणे, हे काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. लोंढेंनी आधी महानगरपालिकेची प्रभागाची वा वार्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे थेट आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अतुल लोंढे यांनी केलेल्या बालीश वक्तव्याचा धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना विदर्भाचा अनुशेष, धानाचे प्रश्न, भेल प्रकल्प एकूणच विदर्भाच्या जनतेची प्रतारणा होत असल्याचे ते बोलले. एखाद्या मोठ्या स्तरावरील नेत्यावर थेट आरोप केले की मनाला समाधान वाटते या भ्रमात असलेल्या अतुल लोंढेंचे वक्तव्य हे ते कोणत्याही पातळीवर काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या सारखे वाटत नसल्याची प्रचिती देणारे आहे, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये विदर्भाच्या संदर्भात जे आवाज उचलले, जे निर्णय घेतले. त्यापैकी एक तरी निर्णय या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे का, असा सवालही अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.
विदर्भाचा अनुशेष, धानाचे प्रश्न यावर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्णय घेतले. धानाचा बोनस त्यांनी एका झटक्यात देऊन टाकला. मात्र महाविकास आघाडी सरकार अजूनही बोनस देऊ शकले नाही. अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी विशेषत: काँग्रेसच्या मंत्र्यांनी, प्रदेशाध्यक्ष असलेल्या विदर्भातील नाना पटोले यांनी विधानसभेत कोणत्या प्रश्नावर आवाज उचलला, असाही घणाघाती सवाल त्यांनी केला.
त्यातही कुठेही कशाचेही ताळमेळ नसलेले लोंढे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतात. दक्षिण पश्चिम मतदार संघातील नागरिकच नव्हे तर नागपूर शहर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांचे कार्य, त्यांचे नेतृत्व मान्य करीत त्यांना भरभरून प्रेम दिले आहे. लोंढेंनी आधी साधी नागपूर महानगरपालिकेची प्रभागाची निवडणूक लढवून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावे, हिंमत असेल तर आमच्या समोर येऊन दाखवावे असे थेट आव्हान देत अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी अतुल लोंढे कोणत्याही प्रकारे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते वाटत नसून त्यांच्या हरकती बालीशपणाच्या असल्याचा टोलाही लगावला.