राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण – उद्योग मंत्री उदय सामंत

– उद्योग जगतासाठी फायदेशीर

– ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली’

नागपूर :- उद्योग जगतासाठी ‘सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-2023 (सीडीसीपीआर)’ तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योगांना चालना मिळेल. उद्योग जगतासाठी ही नियमावली फायदेशीर असून राज्याच्या सर्वंकष उद्योग विकासाचे धोरण असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन उद्योगमंत्री  सामंत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विपीन शर्मा, मुख्य नियोजिका डॉ. प्रतिभा भदाणे यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचे (सीडीसीपीआर) कार्यशाळेचे आयोजन उपराजधानीत करण्यात येत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी तसेच विदर्भासाठी गौरवास्पद आहे. नवउद्योजक वाढीसाठी ही नियमावली उपयुक्त आहे. उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन एमआयडीसी क्षेत्रात उद्योग वाढीसाठी सीडीसीपीआरची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमातून रोजगार निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. अमरावती येथे या कार्यशाळेचे आयोजनही आज करण्यात आले. टप्प्याटप्प्याने नाशिक, पुणे यासह राज्यभरात सीडीसीपीआरचे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योजक व कारखानदारांना सुलभरित्या उद्योग उभारता यावा, यासाठी ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबविली जाणार आहे. या माध्यमातून उद्योजकांना 30 दिवसांत उद्योगाला लागणाऱ्या आवश्यक परवानग्या दिल्या जाणार आहेत. राज्यात नवीन उद्योग विकासाच्या दृष्टीने शासनाद्वारे सर्वंकष प्रयत्न होत असून परदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र अग्रेसर आहे. गेल्या वर्षभरातील गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल तर कर्नाटक दुस-या क्रमांकावर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून यंदा 13 हजार 226 उद्योजकांना सुमारे 550 कोटी अनुदान वितरित करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे 30 हजार व्यक्तींना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूरसह विदर्भातील 11 जिल्ह्यातील उद्योगाचा आढावा घेण्यासाठी सर्व जिल्ह्यांना भेटी देणार. तसेच सर्वच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचा आढावा घेऊन विदर्भाच्या औद्योगिक विकासाला चालना दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच जुन्या उद्योगांच्या पुनर्बांधणीसाठी सीडीसीपीआर नियमावली तयार करण्यात आली असल्याचे शर्मा यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी उद्योग जगतातील चंद्रपूर, वर्धा आणि नागपुरातील प्रतिनिधींनी उद्योगाविषयीची आपल्या अडचणी, समस्या मंत्रिमहोदयांसमोर मांडल्या. नागपुर सीडीसीपीआरबाबतची सविस्तर माहिती  भदाणे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामपंचायत केम येथे वृक्षारोपण कार्यक्रम

Wed Jul 12 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- संत तुकडोजी महाराजांनी सांगीतल्यानुसार ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही म्हण कायम लक्षात घेत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा यावर केम ग्रा प तर्फे भर देण्यात येत असल्याचे मौलिक प्रतिपादन केम ग्रा प चे सरपंच अतुल बाळबुधे यांनी केम ग्रा प येथे आयोजित वृक्षारोपण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!