– मनपाच्या विविध विकास कामाचा घेतला आढावा : खाजगी जमीन शासन जमा करण्याला प्राधान्य
नागपूर :- नागपूर शहरातील खाजगी जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करा तसेच खाजगी जागेवरील स्थायी भाडेपट्टा देणे बाबत एक नियमावली तयार करावी व जागा शासन जमा करुन ऑगस्ट 2024 पर्यंत खाजगी मालकिच्या जागेवरील झोपडपट्टी धारकांना भाडेपट्टा देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी जागेवरील झोपडट्टीतील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमीत क्षेत्र नियमानुकूल करून स्थायी भाडेपट्टे देण्याबाबत मनपाद्वारे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपाच्या कामाचा उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
खाजगी जागेवर असलेल्या झोपडपट्टी नियमानुसार करण्यासाठी संबंधित जागेच्या मालकांना टीडीआर मोबद्ला देऊन उक्त जागा शासन जमा करावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.
देवगीरी’येथे आयोजित आढावा बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री नरेश बोरकर, कमलेश चव्हाण, राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, अल्पना पाटणे, उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी, माजी नगरसेवक सर्वश्री अविनाश ठाकरे, ओमप्रकाश यादव, नागेश मानकर आदी उपस्थित होते.
शासन निर्णयानुसार खाजगी जागेवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमीत क्षेत्र घोषीत झोपडपट्टी म्हणून संबोधले गेले असेल तर अशा खाजगी जागेवरील झोपडपट्टीवासीयांना पट्टेवाटप करण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे झोपडपट्ट्यांचे सी.एफ.एस.डी., आर्चीनोव्हा आणि इमॅजिस या खाजगी एजन्सीकडून पीटीएस व आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये २९८ घोषीत आणि १२८ अघोषीत अशा एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत. यापैकी खासगी जागेवरील झोपडपट्ट्या नियमानुकूल करण्यासंदर्भात कार्यवाहीच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने झोपडपट्ट्या वसलेल्या खासगी जागा ताब्यात घ्यावात. तसेच नोटीस काढून नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यांनी आंबेडकर नगर, दंतेश्वरी, गोपालनगर, प्रियंकावाडी, सहकार नगर, गुजरवाडी, रामटेकेनगर, रहाटे नगर टोली, राजीवनगर, चिंचभुवन शांती निकेतन येथील व इतर झोपडपट्ट्यांच्या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला.
रस्ते, गडरलाईन, स्वच्छतेचाही घेतला आढावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचा देखील बैठकीत आढावा घेतला. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची गती वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासनाला निर्देश दिले. नागरिकांकडून मनपाकडे मांडण्यात येत असलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही व्हावी यादृष्टीने मनपाची तक्रार निवारण यंत्रणा गतीमान करण्याचेही निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यांनी गडरलाईनच्या समस्यांवर नागरिकांना दिलासा मिळावा व त्यांच्या समस्येचे समाधान व्हावे यादृष्टीने प्राधान्याने कार्य करण्याचे देखील निर्देशित केले. पावसाचे पाणी जमा होणा-या भागांमध्ये प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा देखील त्यांनी आढावा घेतला. काम झालेल्या ठिकाणी माहितीचे फलक ठळक आणि दर्शनीय असावेत याबाबत त्यांनी नासुप्र आणि मनपाला निर्देश दिले.