– ऑईलचा पुरवठा केल्यानंतरही पैसे दिलेच नाहीत
– मध्यप्रदेशातील ठकबाजाने नागपुरात घातला गंडा
– हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर :- मध्यप्रदेशातील एका ठकबाजाने मोठे कंत्राट मिळाल्याची बतावणी करून कंपनीच्या संचालकाकडून ऑईलची मागणी केली. त्याची परस्पर विक्री करून एक कोटी ९६ लाख फसविले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन शर्मा असे त्या ठकबाजाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईच्या गोरेगावातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
इंद्रनगर, नरसाळा येथील रहिवासी फिर्यादी स्पर्श गावंडे (२७) यांचा पेट्रोलियम प्रॉडक्ट ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. घरीच त्यांचे कार्यालय आहे. ऑईलचा पुरवठा करण्याचा त्यांच्याकडे परवाना आहे. ते ऑईल बोलावितात आणि मागणी प्रमाणे विविध राज्यांत पुरवठा करतात.
आरोपी सचिन हा मूळचा मध्यप्रदेशातील असून, त्याने कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोखारा येथे भाड्याने खोली घेतली. श्याम एंटरप्रायजेस या नावाने घरीच कार्यालय असल्याचे भासविले. दरम्यान २०२३ मध्ये लोकेश इंफ्रा प्रा. लि. या कंपनीला वेस्टर्न कोलफिल्ड लि. मायनिंगचे कंत्राट मिळाले असून, सबकॉण्ट्रॅक्टर स्वत: असल्याचे त्याने फिर्यादीला सांगितले. मानयिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑईलचा वापर होणार असून त्यासाठी फिर्यादीकडे आरोपीने ऑईलची मागणी केली. मोठे कंत्राट मिळाल्याने फिर्यादीदेखील आनंदी होते. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात करारही झाला. त्यामुळे शंका उपस्थित करण्यास जागाच नव्हती. मोठा करार असल्याने फिर्यादीने आरोपीला ऑईलचा पुरवठा केला. सुरुवातीला आरोपीने पुरवठा केलेल्या रक्कमही दिली. त्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला.
२३ मे २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी ऑईलची मागणी केली. फिर्यादीने विश्वास ठेवून त्याला एक कोटी ९२ लाख ६१ हजार रुपये किमतीचा ऑईलचा पुरवठा केला. मात्र, त्या बदल्यात पैसे मिळाले नाहीत. फिर्यादीने पैशांसंदर्भात विचारपूस केली असता बँकेत आर्थिक व्यवहार करावा लागतो, असे सांगून फिर्यादीकडे आरोपीने चार लाखांची मागणी केली. दोन टप्प्यांत चार लाख रुपये दिल्यानंतरही ऑईल पुरवठ्याच्या बदल्यात आरोपीने पैसे दिले नाहीत. फिर्यादीने अनेकदा पैशांसंदर्भात विचारणा केली असता तो टाळाटाळ करायचा. नंतर तो धमकी देऊ लागला. कालांतराने त्याने घर आणि कार्यालय बंद केले आणि गायब मोबाईलवरही प्रतिसाद मिळत असल्याने फिर्यादीने पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना सारा प्रकार सांगितला. भेदोडकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.