– सहाव्या खासदार महोत्सवाचा समारोप
नागपूर :- रस्ते, वीज, पाणी या मुलभूत भौतिक सुविधांसोबतच नागपूर शहरातील खेळाडूंचा विकास व्हावा, याहेतूने खासदार क्रीडा महोत्सवाची सुरूवात करण्यात आलेली आहे. नागपूर शहराच्या भौतिक विकासासोबत खेळाडूंचा सर्वांगिण विकासासाठी देखील पूर्णत: कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून मागील 17 दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचा आज रविवारी 28 जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे समारोप झाला. या नेत्रदिपक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. मंचावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, जेसीबी इंडियाचे सीईओ आणि एमडी दिपक सेट्टी, उपाध्यक्ष जसमीत सिंग, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, सर्व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रिमोटची बटन दाबून खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या पर्वातील क्रीडा ज्योत शांत केली. छत्रपती पुरस्कार्थी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचा ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवला.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरसोबतच विदर्भातील खेळाडूंचा विकास व्हावा याहेतूने यावर्षी 6 खेळांच्या विदर्भस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी 17 दिवस, 55 खेळांच्या 65 क्रीडांगणांवर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 67 हजार 787 खेळाडूंनी सहभाग घेतला. या खेळाडूंना 1 कोटी 35 लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महोत्सवात चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला, या सर्वांचे अभिनंदन करताना ना. गडकरी यांनी मैदानांमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित राहिलेल्या नागपूरकरांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविक खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले. ते म्हणाले, खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी दरवर्षी खेळ आणि पुरस्कारांच्या राशीमध्ये वाढ करण्यात येते. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील वर्षीपासून विमा देखील काढण्यात येतो. पाचव्या पर्वापर्यंत क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत शशांक मनोहर, सरदार अटल बहादूर सिंग,भाऊ काणे, डॉ. बबनराव तायवाडे, विजय मुनीश्वर यांना क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी क्रीडा महर्षी पुरस्काराऐवजी उत्कृष्ट संघटना, उत्कृष्ट संघटक आणि उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. खेळ आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी सातत्याने खासदार क्रीडा महोत्सवाचे स्वरूप वाढत असल्याचे सांगत त्यांनी पोलिस, मनपा प्रशासन तसेच पत्रकारांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद व आरजे मोना यांनी केले.
सुभाष क्रीडा मंडळ, हरेश व्होरा, गणेश पुरोहित यांचा गौरव
खासदार क्रीडा महोत्सवाद्वारे यंदा पहिल्यांदाच देण्यात येत असलेल्या तीन नव्या पुरस्कारांपैकी उत्कृष्ट संघटना पुरस्कार कॉटन मार्केट येथील सुभाष क्रीडा मंडळाला प्रदान करण्यात आला. मंडळाच्या प्रतिनिधींनी स्मृतीचिन्ह आणि 1 लाख रुपये रोखचे मान्यवरांचे हस्ते स्वीकार केले. तर नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री. हरेश व्होरा यांनी उत्कृष्ट संघटक आणि बॉक्सिंगचे प्रशिक्षक श्री. गणेश पुरोहित यांनी उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराचा स्वीकार केला. याशिवाय खासदार क्रीडा महोत्सव समितीकडे प्राप्त अर्जांमधून निवड झालेल्या 14 खेळाडूंना क्रीडा भूषण पुरस्कार (स्मृतीचिन्ह व प्रत्येकी 25 हजार रुपये रोख) देखील प्रदान करण्यात आला.
क्रीडा भूषण पुरस्कार्थी
निकीता जोसेफ (बॅडमिंटन), कोमल महाजन (खो-खो), जिज्ञासा झाडे (जिम्नॅस्टिक – रिदमीक), भव्यश्री महल्ले (अॅथलेटिक्स), जान्हवी हिरूडकर (क्रॉसकंट्री), शावरी पखाले (रायफल शूटिंग), सौरभ वानखेडे (सॉफ्टबॉल), समिक्षा चांडक (बास्केटबॉल), टिया आवळे (तायक्वाँडो), राशी गवई (तिरंदाजी), मृणाली बानाईत (योगासन), शर्वरी गोसेवाडे (तलवारबाजी), वेदिका पॉल (बु्द्धिबळ), अल्फीया खान (जिम्नॅस्टिक्स – अॅक्रोबॅटिक्स)
इक बात बता दे तो… बी.प्राकची एंटी आणि जल्लोष
समारोपी कार्यक्रमात मान्यवर मंचावरून खाली येताच उपस्थित प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. यशवंत स्टेडियमवर सर्वदूर पसरलेली तरूणाईची नजर फक्त ‘त्याला’च शोधू लागली. प्रेक्षकांना अधिक वेळ वाट न पहायला लावता. बी.प्राक मंचावर आला. येताच त्याने ना.नितीन गडकरींना अभिवादन केले. जग माझे ‘फॅन’ असले तरी मी तुमचा फॅन असल्याचे सांगत त्याने त्याच्या गाजलेल्या अप्रतिम गाण्यांच्या श्रृ्ंखलेला सुरुवात केली. ‘इक बात बताओ तो..’ ने सुरूवात करीत त्याने पाठोपाठ ‘मैं किसी ओर का हूं फिलहाल…’, ‘दिल तोड के हंसती हो मेरा…’, ‘तू मैंनू छड जाना…’, ‘चूप हैं चूप हैं रांजा…’, ‘तू ही बदल गया मैं तई…’, ‘मैं रज रज हिज्र मनावा..’, ‘आज तक मैंनू ऐसा प्यार…’, ‘इलाही मेरा जी…’, ‘आज की रात…’ ”तेरी मिट्टी में…’ अशा एकाहून एक नॉनस्टॉप गाण्यांनी अक्षरश: उपस्थितांना मोहित केले. मोबाईलचे फ्लॅश ऑन करून तरुणाईने देखील बी.प्राकला दाद दिली.