दिव्यांगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी

– सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण

नागपूर :- यापूर्वी आम्ही दिव्यांगांना ४० कोटी रुपयांचे साहित्य दिले होते. आज खासदार निधीतून ३५ दिव्यांगांना आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटराईज्ड ट्रायसिकल दिल्या. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यादृष्टीनेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून, समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मंत्री महोदयांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात या ट्रायसिकलचे वितरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी यांनी सांगितले. नागपूर शहरातील उपेक्षित, दिव्यांग, अनाथांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भविष्यात ट्रायसिकलची मॅरेथॉन आयोजित करण्याचाही विचार असल्याचे ना. गडकरी म्हणाले. यावेळी एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, रवी शर्मा, एन. नरेश कुमार, के. लेंका, तर सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे, माधुरी कांबळे, व्यंकटेश बेलखोडे, रोहिणी, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. प्रीती मनमोडे यांच्यासह भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.

अशी आहे मोटराईज्ड ट्रायसिकल*

सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत देण्यात आला आहे. समायोजित (अ‍ॅडजस्टेबल) होऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

*स्व. भानुताई गडकरी संस्थेतर्फे आरोग्य शिबीर*

स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने यावेळी दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला ना. गडकरी यांनी भेट दिली. या शिबिरात नेत्र, दंत व कर्ण तपासणी करण्यात आली. डॉ. गिरीश चरडे, डॉ. सारंग दांडेकर, डॉ. अनुराधा, अजय मुखर्जी, शिवांगी गर्ग, डॉ. अंकित भांगे, डॉ. रुपाली थोटे, आशीष जोशी यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परीश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेयो हे देशातील आघाडीचे हॉस्पिटल व्हावे - केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी

Sun Feb 25 , 2024
– इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नागपूर :- उत्तम आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांच्या आधारावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) हे केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशातील आघाडीचे हॉस्पिटल व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. मेयो रुग्णालयात आयोजित भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ना.गडकरी बोलत होते. मेयो हॉस्पिटल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!