मनपाची अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्यास कटिबद्ध – मनपा प्रशासक व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

– अग्निशमन सेवा दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन आणि आपात्कालीन विभाग पार पाडतो. केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणा-या अग्निशमन विभागाला अधिक सक्षम करण्यास मनपा कटिबद्ध असून त्यादृष्टीने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातर्फे अग्निशमन सेवा दिवसाच्या अनुषंगाने रविवारी (ता. १४) मनपा मुख्यालयातील हिरवळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त प्रकाश वराडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवरांनी अग्निशमन कार्य करताना प्राणाची आहुती देणारे शहीद गुलाबराव कावळे, शहीद प्रभू कुहिकर व शहीद रमेश ठाकरे या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी मनपा आयुक्तांना अग्निशमन विभागाद्वारे मानवंदना देण्यात आली. परेडचे निरीक्षण करून आयुक्तांनी अग्निशमन जवानांची मानवंदना स्वीकारली.

पुढे बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीत अग्निशमन जवानांनी बजावलेल्या सेवाकार्याचे कौतुक केले व पुढेही शहरासाठी समर्पित भावनेने तत्परतेने कार्य करण्याचे आवाहन केले. शहराची लोकसंख्या वाढत असताना सुरक्षेचा भारही वाढत आहे. अशात शहरात अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मनपा मुख्यालयासह विविध ठिकाणी ९ अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. ही संख्या २२ करण्याच्या दृष्टीने कार्य प्रगतीपथावर आहेत. जुन्या केंद्रांना देखील अद्ययावत करण्यात येत असून लवकरच ही केंद्रे नागरिकांच्या सुविधेत दाखल होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अग्निशमन विभाग अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असावे यासाठी मनपाचा प्रयत्न आहे. शहरात अधिक उंचीच्या इमारती आकारास येत आहेत. अशा ठिकाणी कुठलीही दुर्घटना झाल्यास तात्काळ प्रतिसाद मिळावा याकरिता ७० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यात येणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.

अग्निशमन दलाचा मुख्य उद्देश्य आपत्कालीन सुविधा प्रदान करण्याचा असला तरी विविध प्रकारचे ना-हरकत प्रमाणपत्र व इतर सुविधांच्या माध्यमातून विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात मनपाच्या उत्पन्नात १७ कोटी ३८ लक्ष रुपयांची भर टाकल्याची माहिती देत विभागाच्या या कामगिरीबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त करीत विभागाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी  सुनील मेश्राम, हॉटेल असोसिएशनचे तेजिंदरसिंग रेणू, क्रेडाईचे  गौरव अग्रवाल, जयंत पाठक, केअर हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले तर आभार मुख्य अग्निशमन अधिकारी  बी.पी. चंदनखेडे यांनी मानले.

मिडले ड्रिल स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान

अग्निशमन विभागातर्फे घेण्यात आलेल्या मिडले ड्रिल स्पर्धेतील विजेत्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक लकडगंज अग्निशमन केंद्र, द्वितीय क्रमांक मनपा मुख्यालय अग्निशमन केंद्र आणि तृतीय क्रमांक त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र यांनी प्राप्त केला. तिनही संघांना विजयी चषक आणि प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले. याशिवाय वैयक्तिक ड्रिल स्पर्धेमध्ये प्रसाद बावनकर, कमलेश कुमरे आणि बबन जाधव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांनाही आयुक्तांनी चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले. यावेळी प्रकाश कलसिया आणि त्यांच्या चमूला देखील सन्मानित करण्यात आले.

ड्रिल प्रात्यक्षिकांचा थरार

कार्यक्रमामध्ये अग्निशमन विभागाद्वारे आपात्कालीन स्थितीत करण्यात येणा-या कार्याचे ड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एखाद्या इमारतीमध्ये जवान ज्या पद्धतीने कार्य करतात ते दर्शविणारे टॅक्टिकल मिडले ड्रिल, अग्निशन विभागाच्या ४२ मीटर उंचीच्या टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने इमारतीमधून आगीच्या व आपात्कालीन प्रसंगी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची प्रक्रिया टी.टी.एल. ड्रिल, पेट्रोल, डिझेल, ऑईल, तारपेंट यासारख्या ज्वलनशील द्रव्यावरील आगीवर मात करणारी ऑईल फायर ड्रिल, आगीच्या ठिकाणी विविध पद्धतीने पाण्याचा मारा करणारे व्हेरियर ब्रॅचेस व जेट डिमॉस्ट्रेशन ड्रिल आदी ड्रिलच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या साहसी कामगिरीचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरुणांची गर्दी, ज्येष्ठांचा आशीर्वाद अन् महिलांचा उत्साह! ना. नितीन गडकरी यांचे दक्षिण नागपुरात जंगी स्वागत

Sun Apr 14 , 2024
नागपूर :- ज्येष्ठांचा आशीर्वाद, महिलांचा उत्साह आणि तरुणांच्या प्रचंड गर्दीच्या साक्षीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचे दक्षिण नागपुरात आज (शनिवार) जंगी स्वागत झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज दक्षिण नागपुरात दाखल झाली. रमणा मारोती परिसरात यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी आमदार मोहन मते, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com