नागपूर :- नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्पात पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून भूजल पुनर्भरण होईल. स्नेहनगर, खामला येथील या कामाची पाहणी बुधवारी (ता. ९) नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.
नागपूर महानगरपालिकेने सिमेंट रस्ते टप्पा ४ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी संकलित करून भूजल पातळी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे आणि जल पुनर्भरण तसेच पूर नियंत्रण साधणे आहे.
मनपा आयुक्तांनी गुलमोहर सभागृहांच्या मागे आणि जॉगर्स पार्कजवळ असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात पाणी संकलन आणि जल पुनर्भरणाच्या प्रणालीची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे उपस्थित होते. कंत्राटदार राजेश दयारामानी यांच्याकडून रस्त्याचे काम सुरू आहे.
पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी आणि भूजल पुनर्भरणासाठी रस्त्याच्या बाजूला २० मीटर खोल खड्डा खोदण्यात आलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी शोषित होऊन भूजल पातळी वाढवेल. हा खड्डा पावसाळी नालीसह जोडण्यात आलेला आहे, ज्यामुळे पावसाचे पाणी त्या नाल्याद्वारे खड्ड्यात जाईल आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवेल.
सिमेंट रस्ते टप्पा ४ मध्ये २३.४५ किलोमीटर लांबीचे ३३ रस्ते तयार होणार आहेत, आणि यामध्ये १४७ जल पुनर्भरण आणि पाणी संकलन खड्डे तयार केले जातील. तालेवार यांनी आयुक्त यांना भूजल पूनर्भरण प्रणाली कशा प्रकारे तयार केली यांची माहिती दिली व मुख्य अभियंता यांनी सांगितले की, एक महिना या प्रणालीचे निरीक्षण करून त्यावर निर्णय घेतला जाईल. या खड्ड्यावर लोखंडाची जाळी टाकण्यात आलेली आहे, आणि वरचा कचरा स्वच्छ करण्यासाठी सुविधाही पुरविण्यात येईल. कंत्राटदाराला १० वर्षे या रस्त्यांचे आणि पाणी संकलन प्रणालीचे देखरेख करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.
आयुक्तांनी या जल पुनर्भरण प्रणालीचे कौतुक केले आणि काही महत्त्वाचे निर्देशही दिले. यावेळी उपअभियंता शशांक ताटेवार, कनिष्ठ अभियंता पुरषोत्तम पांडे, आणि व्यवस्थापन सल्लागार निलेश उगेमुगे उपस्थित होते.