सीवरलाईन वरील मॅनहोल्सच्या स्वच्छतेसाठी रोबोटीक उपकरणांची मदत
स्वच्छ आणि सुंदर नागपूरकडे मनपाचे आणखी एक पाऊल
नागपूर :- नागपूर शहरातील मॅनहोल्सची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सीवरलाईनच्या मॅनहोलमध्ये प्रवेश न करता ते सुरक्षितपणे स्वच्छ करता यावे, यासाठी नागपूर स्मार्ट सिटीच्या तीन रोबोट भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सोमवारी रोबोटद्वारे केल्या जाणाऱ्या स्वच्छतेचे निरीक्षण केले.यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, स्मार्ट सिटीचे मोबिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक राजेश दुफारे, ई- गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले, पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर, डॉ पराग अंर्मल, कुणाल गजभिये आदी उपस्थित होते. नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने अत्याधुनिक रोबोट मशीन भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या रोबोट मशीनमुळे नागपूर शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्येवर दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मॅनहोल्सच्या देखभाली मध्ये अधिक सुरक्षितता आणण्यासाठी हा उपक्रम नागपूर स्मार्ट सिटीच्या दृष्टीकोनातून संरेखित आहे.नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, सध्या मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा 2013 च्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे १० जेट्टींग मशीन आणि ४ सक्शन (suction) मशीन आहेत. त्याच्या सहाय्याने मोठ्या रोडवर सिवर चेंबरची स्वच्छता करण्यास मदत होते. पण लहान रोडवर हे करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत होणार आहे. आय.ओ.टी.वर आधारित हे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सिवर चेंबरच्या स्वच्छतेत मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय हा पायलट प्रकल्प असून, समाधानकारक काम आढळ्यास महानगरपालिका अधिक प्रमाणात रोबोट घेण्याचा विचार करेल. हे रोबोट जेनोरोबोटिक्स कंपनी कडून भाडेतत्वावर घेण्यात आले असून, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे या कंपनीला प्रत्येकी रोबोटच्या मागे सात लाख रुपये भाडे निश्चित केले आहे, असेही त्यांनी सांगितले.रोबोटला कॅमेरा व हात
शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छता आणि देखभाली साठी घेण्यात आलेल्या सदर विद्युत रोबोटला कॅमेरा व यांत्रिकी हात आहेत. रोबोट साधारणतः १० मीटर खोल जाऊन मॅनहोल स्वच्छ करू शकतो. स्वच्छ भारत मिशन २.० मध्ये केंद्र शासनाने मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी मनुष्य ऐवजी मशीनचा वापर करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूरच्या दिशेने हे मनपाचे उत्तम पाऊल आहे. केरळच्या स्टार्ट अप कंपनीतर्फे हा bandicoot रोबोट तयार करण्यात आला असून,या आविष्काराला पुरस्कार मिळाला आहे.