चंद्रपूर :- राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य मा.डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली ७ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न नियमानुसार मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस डॉ.वावा यांच्यासह सल्लागार नाथ,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,बल्लारपूर, ब्रह्मपुरी,मुल नगर परिषद यांचे मुख्याधिकारी, उपायुक्त मंगेश खवले,उमेश पिंपरे,राष्ट्रीय अध्यक्ष,महादलित परिसंघ, वीरेंद्र नाथ, सामाजिक कार्यकर्ता तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थीत होते. दरम्यान, मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी डॉ. वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी डॉ.वावा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. सफाई कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा व शासनाद्वारे वेळोवेळी काढण्यात आलेले जीआर यांची अंमलबजावणी करण्यात यावी. कामगारांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच हक्कापासून सफाई कामगार वंचित राहणार नाहीत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत स्वच्छता विभाग प्रमुख डॉ.अमोल शेळके यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मॅन्युअल स्कॅव्हेंजर कायदा २०१३ च्या अंमलबजावणीबाबत मनपा करीत असलेल्या प्रयत्नांचाही माहीती दिली त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना पक्के घरे उपलब्ध करण्यासाठी मनपा प्रयत्नरत असुन याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असल्याचीही माहीती याप्रसंगी देण्यात आली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली,कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिराची मागणी केली असता आरोग्य शिबिरे यापुर्वीही आयोजित केली गेली आहेत मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या भागात आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे मनपाद्वारे सांगण्यात आले.