– नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली कामाची पाहणी
नागपूर :- नागपूर शहरातील गजबजलेल्या व दाट वसाहतीतील सीवर चेंबरची स्वच्छता नागपूर स्मार्ट सिटी आणि नागपूर महानगरपालिका यांच्या अत्याधुनिक रोबोटद्वारा केल्या जात आहे. शहरातील स्वच्छता दूत यांची सुरक्षितता आणि आरोग्यास प्राधान्य देत नागपूर स्मार्ट सिटी व मनपाच्या अत्याधुनिक रोबोट मशीनद्वारा मागील ११ महिन्यात मनपाच्या १० झोनमध्ये ८ हजार ५७८ पेक्षा अधिक सीवर चेंबरची स्वच्छता करण्यात आली आहे.
नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी रोबोट मशीन द्वारे सीवर चेंबरच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रोबोटिक स्कवेंजर मशीन हाताळणारे प्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामाची माहिती जाणून घेतली.
यावेळी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले की, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायदा 2013 च्यानुसार मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवर बंदी घालण्यात आली आहे. लहान रोडवर सीवर चेंबरची स्वच्छता करणे अडचणीचे ठरते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोबोटद्वारे स्वच्छता प्रणालीची मदत घेण्यात येत आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग रोबोट लहान रस्त्यावर किंवा गल्ल्यांमध्ये सुद्धा सीवर चेंबरच्या स्वच्छता करीत आहे. याचा लाभ निश्चित स्वरूपात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळत आहे, असे हि त्यांनी सांगितले.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केरल येथील जेनोरोबोटिक्स कंपनी कडून ३ बंडिकूट रोबोट भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत .या मशीन नागपूर महापालिकेला सीवर चेंबरची स्वच्छता करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. मशीनद्वारे मॅनहोल्समधून काढलेला कचरा एका प्लेटच्या साहाय्याने मशीनमध्ये टाकता येतो. त्यासाठी कामगारांना कचरा, मलब्याला हात लावण्याची गरज पडणार नाही, कोणाला मेनहोलमध्ये उतरण्याची सुद्धा गरज नाही.
रोबोटला कॅमेरा व हात
शहरातील मॅनहोल्सच्या स्वच्छता आणि देखभाली साठी घेण्यात आलेल्या सदर विद्युत रोबोटला कॅमेरा व यांत्रिकी हात आहेत. रोबोट साधारणतः १० मीटर खोल जाऊन मॅनहोल स्वच्छ करू शकतो. स्वच्छ भारत मिशन २.० मध्ये केंद्र शासनाने मॅनहोलच्या स्वच्छतेसाठी मनुष्य ऐवजी मशीनचा वापर करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छ आणि सुंदर नागपूरच्या दिशेने हे उत्तम पाऊल आहे.