-चिमुकलीला मारहाण केल्याचा आरोप
– पाणी विक्रेत्याचे डोके फुटले
नागपूर :- क्षुल्लक कारणावरून अवैध विक्रेत्यांचे आपसात भांडण झाले. वाद विकोपाला जाताच दोघेही एकमेकांवर तुटून पडले. हाणामारीत पाणी विक्रेत्याचे डोके फुटले. तर दुसरीकडे काकडी विक्री करणार्या महिलेने तिच्या पाच वर्षाच्या मुलीच्या पोटावर मारल्याचा आरोप केला. ही घटना नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर थांबलेल्या गाडीत घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही विक्रेत्याविरूध्द गुन्हा नोंदविला.
उन्हाची तीव्रता वाढल्याने थंड पाणी आणि थंड पेय आणि काकडीची सुध्दा मागणी वाढली. त्यामुळे पाणी विक्रेत्यांसह काकडी विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. संतोष ढोके (41) हा पाणी विकतो तर सतना (25) ही काकडी विकते. दोघेही रेल्वेचे अधिकृत विक्रेते नाहीत. सतनाचे पती तुषार आणि पाणी विक्रेता संतोष यांची तोंड ओळख आहे. दोन दिवसांपूर्वी संतोषने तुषारच्या मुलीच्या गालावर मारले होते. याचा जाब तुषारने त्याला बुधवारी विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. पती पत्नीने मिळून संतोषला मारहाण केली. त्याचे डोके फुटले. लोहमार्ग पोलिसांनी मेयो रूग्णालयात त्याच्यावर औषधोपचार केला. वैद्यकीय अहवाल आणि संतोषच्या तक्रारीवरून तुषार विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
तर दुसरीकडे सतना हिने सुध्दा तक्रार केली. तिच्या तक्रारीनुसार रेल्वे गाडीत काकडी विकत असताना संतोषने तिच्या पाच वर्षाच्या मुलीच्या पोटावर मारले. मुलगी अस्वस्थ झाली. लोक धावले. यावरून वाद झाला. तिच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी पाणी विक्रेता संतोष विरूध्द गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी त्या चिमुकलीचीही वैद्यकीय तपासणी केली. मात्र, आक्षेपार्ह असे काहीच आढून आले नाही.