प्रथम आगमनप्रसंगी राष्ट्रपतींचा शासनाच्या वतीने राजभवन येथे नागरी सत्कार

– “संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य” : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  

– स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य : राज्यपाल

– द्रौपदी मुर्मु शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तित्व : एकनाथ शिंदे

– राष्ट्रपती मुर्मु यांची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय : देवेंद्र फडणवीस

मुंबई :-समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज येथे व्यक्त केली. 

राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मु यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुरुवारी (दि. ६) राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोर्हे, राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, गायिका आशा भोसले, उद्योजिका राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती मुर्मु यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक व सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या स्वातंत्र्याच्या मंत्राचे स्मरण केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून संगीत क्षेत्रातील पं. भातखंडे, पलुस्कर यांच्यापासून किशोरी आमोणकर व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या योगदानाचा देखील उल्लेख केला.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य : राज्यपाल

द्रौपदी मुर्मु यांचा झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचे भाग्य आपणास लाभले असे नमूद करून द्रौपदी मुर्मु राज्यपालांच्या परिषदेत करीत असलेल्या सूचना राष्ट्रपतींसह सर्वांकडून गांभीर्याने घेतल्या जात, अशी आठवण राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितली.

देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करीत असताना द्रौपदी मुर्मु यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.            द्रौपदी मुर्मू शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तित्व : एकनाथ शिंदे

शिक्षक, नगरसेविका, आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून काम केलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे व्यक्तित्व शून्यातून विश्व निर्माण करणारे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून केल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानून द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यामुळे तेथील पोलीस, सामान्य जनता तसेच प्रशासनाला नवी ऊर्जा मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासन आदिवासी विकासासाठी अनेक योजना राबवित असून आदर्श आश्रमशाळा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती मुर्मू यांची आदिम जनजातींप्रती संवेदना स्पृहणीय : देवेंद्र फडणवीस

द्रौपदी मुर्मु या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत, असे सांगून वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्यांची संवेदना स्पृहणीय आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. द्रौपदी मुर्मु यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मु यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासी कुटुंबात व एका लहानश्या गावात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची राष्ट्राध्यक्ष होणे हा भारताच्या लोकशाहीचा गौरव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सुरवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन

Fri Jul 7 , 2023
मुंबई :-  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा मुंबईतील हा पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले आणि श्रींची आरती केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com