राज्य शासनाच्या मुख्य कार्यक्रमात नागपूर मनपाचा प्रथम पुरस्काराने गौरव
नागपूर :- विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्या कार्यालयात आज नगरविकास दिन साजरा करण्यात आला. मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या नगरविकास दिनाच्या मुख्य कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेला शहर सौंदर्यीकरणाच्या प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला विभागीय सहआयुक्त (नपाप्र) संघमित्रा ढोके, सहायक आयुक्त प्रकाश राठोड, कार्यकारी अभियंता राकेश कुकडे, सहायक आयुक्त (लेखा) किरण घोटकर व इतर अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
74 व्या घटना दुरुस्तीमुळे महिला सशक्तीकरणाला गती मिळाली या दुरूस्तीमुळे समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत लोकशाहीचा विकास पोहचला. स्थानिक स्वराज संस्थांना निवडणुकीमध्ये आरक्षण मिळाले तसेच 1 जून 1993 पासून या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी सुरू झाली. या विषयावर संघमित्रा ढोके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
20 एप्रिल 2023 रोजी मुंबई येथे पार पडलेल्या नगर विकास कार्यक्रमामध्ये नागपूर महानगरपालिकेला शहर सौदर्यीकरणाचा प्रथम क्रमांक प्राप्त असून 15 कोटीचे बक्षीस मिळाले. मौदा नगर पंचायतला शहर सौंदर्यीकरण स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक मिळाला असून 15 कोटीचे बक्षिस प्राप्त झाले. पवनी येथील क वर्ग नगर परिषदेला शहर सौदर्यीकरणासाठी तृतीय क्रमांक मिळाला व 5 कोटीचे बक्षिस प्राप्त झाले. सन 2022-23 ला नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल नगरपंचायत या गटातून कोरची नगरपंचायत यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व नगरपरिषद व नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी या सर्व टिमचे सहआयुक्त संघमित्रा ढोके यांनी अभिनंदन केले.