नागपूर : मकर संक्रांतीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी विशेषतः पतंग उडविल्या जाते. या सणा निमित्ताने मोठ्या प्रमाणात नायलॅान मांजाची खरेदी व विक्री केली जाते. या नायलॉन मांजामुळे अनेकदा गळा कापणे, चेहरा विद्रूप होणे, नाक, कान व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहन चालकांचे मांजास अडकून गंभीर अपघात होणे अशा घटना घडतात. नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या तसेच पशु पक्षी यांच्या जीविताला व आरोग्याला, पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे नायलॅान मांजाचा वापर न करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासह सर्व उपस्थित नागरिकांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राजे रघुजी भोसले नगरभवन (टाऊन हॉल), महाल येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळ्यात ही शपत घेण्यात आली.
जिल्हास्तरावर नायलॉन मांजा विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची शपत कार्यक्रमाच्या प्रारंभी घेण्यात आली. याप्रसंगी नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त गजेंद्र महल्ले, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, नंदकिशोर मानकर, प्रा. प्रभाकर पाटील, प्रकाश बेतावार, युसीएन वृत्तवाहिनीचे संपादक राजेश सिंग यांच्यासह मनपाचे सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.