Ø मुख्यमंत्री भावाशी संवादाने महिला भारावल्या
Ø जिल्ह्यात अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा
यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे या भावाने दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यभर आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला. जिल्ह्यातील 150 बहिणी या संवादात सहभागी झाल्या होत्या. या संवादाने बहिणी अगदी भारावून गेल्या होत्या.
काल जिल्हाभर ठिकठिकाणी या संवादाचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यवतमाळ येथे महिला बालकल्याण भवन येथील सभागृहात संवादाचे थेट प्रसारण झाले. याठिकाणी 150 बहिणी उपस्थित होत्या. जिल्ह्यात ठिकठिकाणी देखील महिला सहभागी झाल्या. मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वेगवेळ्या ठिकाणच्या महिलांशी संवाद साधला. योजनेची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांनी मुख्यमंत्री देखील भारावून गेले.
मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन… घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही… सख्खा भाऊ मला विचारत नाही… पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखाएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे थेट संवादात व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांनी प्रतिमाह 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यात 4 लाख 68 हजार अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाणणी करून 4 लाख 60 हजार अर्ज महिलांच्या खात्यात निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले होते. यापैकी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात टप्प्याटप्याने पैसे जमा होत आहे.
महिला बालकल्याण भवन येथे संवादासाठी उपस्थित महिला आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधतांना भारावून गेल्या होत्या. शासनाने योजना सुरु केली… अर्ज स्वीकारले आणि रक्कमही जमा झाली. इतक्या लवकर रक्कम जमा होईल, असे वाटले नव्हेत, अशी भावना अनेक महिलांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रभाकर उपरे, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत विधाते आदी उपस्थित होते.