‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ’

मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत,

मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.           दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण

मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगरपालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त  चहल यांनी सांगितले.

अशी आहे ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.

घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Balaji Temple at New Mumbai will be a new pilgrimage spot of the State - Chief Minister Eknath Shinde

Wed Jun 7 , 2023
Mumbai :- The Chief Minister Eknath Shinde today expressed confidence that Lord Balaji temple being constructed at Ulave in New Mumbai will become a new pilgrimage spot for the pilgrims in the State.             He was speaking at Bhumipujan (ground breaking ceremony) of Lord Venkateshwara Temple to be constructed by Lord Tirupati Tirumala Devasthanam trust […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com