भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त
मुंबई, दि. १०:- संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भूरळ घातली. जम्मू काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.