– खा. हेमंत पाटील यांच्याकडून कार्यक्रमस्थळी आढावा
वाशिम :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या शनिवार, २० एप्रिल रोजी मंगरूळपीर (जि. वाशिम) येथे येत आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (महल्ले)यांच्या प्रचारार्थ मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद मैदानात सायंकाळी ५ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी, आ. लखन मलिक, आ. मदन येरावार, आ. इंद्रनील नाईक, आ. नीलय नाईक, आ. प्रा. डॉ. अशोक उईके, खा. हेमंत पाटील, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. सभेच्या अनुषंगाने खा. हेमंत पाटील यांनी आज शुक्रवारी मंगरूळपीर येथे सभास्थळी आढावा घेतला.
मुख्यमंत्री नांदेडहून हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यासाठी मंगरूळपीर येथील शासकीय मैदानात हेलिपॅडचे निर्माण कार्य सुरू आहे. खा. हेमंत पाटील यांनी येथे प्रत्यक्ष भेट देवून कामाची पाहणी केली. तसेच कार्यक्रमस्थळी आयोजनाचा आढावा घेतला. या सभेसाठी यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह १० हजारांवर नागरिक उपस्थित राहतील, अशी व्यवस्था कार्यक्रमस्थळी करण्यात आली आहे. वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, पुसद, दिग्रस, मानोरा आदि ठिकाणाहून कायकर्ते या सभेसाठी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही वाशिम जिल्ह्यातील पहिलीच जाहीर प्रचार सभा आहे. या सभेला महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.