“शासन आपल्या दारी” योजनेतून जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी  :- “शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूने लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची मला खात्री आहे. “शासन आपल्या दारी” हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरु झाले आहे. १३ मे रोजी पाटण येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. आज २५ मे म्हणजे केवळ बारा दिवसांत लाखो लाभार्थींची नोंद यात होत आहे हे विशेष आहे.

शासन आपल्या दारी या अभियानावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर या महापुरुषांची भूमी असलेल्या रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे, याचा आनंद होत आहे.

या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर, प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरली पाहिजे. अशा सर्व यंत्रणांना सूचना होत्या. आज ग्राम सेवक, तलाठी, प्रांत अधिकारी स्वत: गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि लाभ देत आहेत, योजनांची माहिती देत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अहमदनगर जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्याने सुद्धा यापासून प्रेरणा घेत या अभियानासाठी नोंदणी शिबिरे घेतली आहेत.

कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देत आहोत. गडचिरोलीसारख्या ठिकाणी दोन महिन्यात एक लाख लाभार्थींची नोंद झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार , तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थींना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे यादृष्टीने सर्व तयारी झाली आहे.या अभियानासाठी १६ हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु केले आहेत.

गेल्या 11 महिन्यात ३५ मंत्रिमंडळ बैठका आणि त्यातून ३५० निर्णय हे सर्वसामान्य माणसांच्या हिताचे घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखी समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एसटीच्या 50 टक्के सवलतीमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. एसटीने दिलेल्या सवलतीमुळे जेष्ठांच्या प्रवासात वाढ झाली आहे.

एमएमआरडीए च्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे. कोकणात दहा हजार मल्टिनॅशनल कंपन्यांनी नोंदणी केली आहे. यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. केंद्र सरकार यासाठी मदत करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग तयार होणार आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल असेही त्यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ या योजनेविषयी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीतला हा पहिला कार्यक्रम आहे, ज्यात अधिकारी गावोगावी, घरोघरी जाऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. रिक्षा चालक आणि मालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या योजनेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिली

‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकी व तीन चाकी गाड्यांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले, तर आभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार यांनी केले. तत्पूर्वी ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या संकल्पनेची सविस्तर माहिती डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

19 गोवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवनदान

Fri May 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव वळण मार्गावरील पाटील ढाब्यासमोरून एका कंटेनर ने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसांनी सदर कंटेनर वर धाड घालून कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेत भंडारा येथील खैरीच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे चार वाजता केली असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com