नागपूर :- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हास्तरावर संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठोंबरे बोलत होते. जिल्हातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना संबंधित महिलेची माहिती अचूक भरावी. कुठल्याही प्रकारची चूक अर्ज भरताना होऊ नये याची दक्षता संबंधितांकडून घेण्यात यावी. याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. नावनोंदणीसाठी आलेल्या महिलेची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.