संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी – महाड तळ्याचे आंदोलन ही केवळ घटना वा कृती नसून बाबासाहेबांनी केलेल्या व्यवस्था मुक्तीचा प्रारंभ असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी भाष्यकार प्रा रणजित मेश्राम यांनी इथे व्यक्त केले.
ते, २० मार्च २४ रोजी, आंबेडकर विचारधारा अध्यासन व विचारधारा विभाग आयोजित व्याख्यानात बोलत होते. ‘महाडच्या चवदार तळ्याचे आंदोलन : आजची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यासन व विभाग प्रमुख डॉ अविनाश फुलझेले हे अध्यक्षस्थानी होते.
पुढे मार्गदर्शन करताना रणजित मेश्राम म्हणाले, अस्पृश्य हा हिंदुतील सर्वात खालचा तरीही अविभाज्य घटक आहे यापलीकडे ओळख नव्हती. दयेच्या नावावर आस्पृश्योध्दाराची वेगवेगळी कर्मे सूरु होती. अशा अंधकार काळात अस्पृश्यांची स्वतंत्र ओळख व स्वत:चे उन्नयन करण्याच्या विश्वासाचे रोपण या चवदार कृतीने केले.पुढे जो मुक्तीप्रवास घडला त्याची बांधणी या कृतीशी असल्याचेही ते म्हणाले.
अनेकानेक दाखले देत रणजित मेश्राम यांनी आज ९७ वर्षानंतर या मुक्तीप्रवास व प्रयासाचे अवलोकन होण्याची गरज असल्याचे म्हटले. आपण काल मध्ये रमावे की आज आणि उद्या त जगावे याकडेही लक्ष वेधले. जे जे संभाव्य धोके बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रसंगातून सांगितले त्यांचे स्मरण व मापन यांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाचे संविधान नजरकैदेत असल्याची सादृश्य स्थिती असल्याचे सांगून ते म्हणाले, तंत्र- यंत्र युगाकडून पुन्हा मंत्र युगाकडे हा देश ढकलण्याकडे जात असल्याची चिंता रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी असलेले विभागप्रमुख डॉ अविनाश फुलझेले यांनी समयोचित असे अध्यक्षीय भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील विद्यार्थी मिथुन दुपारे यांनी तर आभारप्रदर्शन भीमराव फुसे यांनी केले. या व्याख्यानाला विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.