– अहमदाबाद – हावडा एक्सप्रेसमधील घटना
नागपूर :-धावत्या रेल्वेत एका बेवारस बॅगने प्रचंड खळबळ उडाली. गाडी नागपूर स्थानकावर आल्यानंतर बॅगची श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. श्वान लियोने बॉम्ब सदृष्य वस्तू असल्याचा कुठलाच ईशारा दिला नाही, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
12833 अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस नागपूरच्या दिशेने येत असताना एस-3 बोगीतील 49 क्रमांकाच्या बर्थवर एक बॅग बेवारस आढळली. बराच वेळ पासून बॅगचा मालक नसल्याने प्रवाशांत कुजबुज सुरू झाली. बॅग विषयी एकमेकांना विचारणा केली जात होती. दरम्यान एका सजग प्रवाशाने ही माहिती लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. लगेच लोहमार्ग पोलिस ठाण्याला माहिती मिळताच पोलिस नायक संदीप तुमडाम यांनी अधिकार्यांना तसेच बीडीडीएस पथकाला कळविले. गाडी प्लॅटफार्म क्रमांक 6 वर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोहोचली. तत्पूर्वी लोहमार्ग पोलिस आणि श्वान पथक फलाटावर उपस्थित झाले. श्वान पथकातील पोलिस नायक राहूल गवई, रवींद्र बांते, मनोज वाडेकर, भावेश राना, नरेंद्र मोंढेकर आणि श्वान हॅण्डलर पंकज बोरकर यांनी ट्राली बॅगची तपासणी करून घेतली. श्वान लियो कडून कुठल्याही प्रकारचा ईशारा मिळाला नाही. त्यामुळे संबधित बॅग महिला पोलिस हवालदार वंदना सोनवने यांच्या ताब्यात देण्यात आली. संबधित व्यक्तीची ओळख पटल्यानंतर बॅग त्यांच्या सुपूर्द केली जाईल.