श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर!

– आकर्षक रोषणाई व आतषबाजीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष

– अभूतपूर्व उत्साहाने वातावरण भक्तीमय

– पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निघाली शोभायात्रा

चंद्रपूर :- आकर्षक रोषणाई… लक्षवेधक आतषबाजी… श्रीराम नामाचा जयघोष… अभूतपूर्व उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले… यामुळे अवघे चंद्रपूर श्रीरामनवमीच्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी अवघे चंद्रपूर दुमदुमले. शहरातील मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निघालेली शोभायात्रा चंद्रपूरकरांसाठी खऱ्या अर्थाने भक्तीमय मेजवानी ठरली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गिय आयोगाचे अध्यक्ष तथा भाजपा ज्येष्ठ नेते हंसराज अहिर आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते शोभायात्रेत सहभागी झाले होते.

चंद्रपूर शहरात श्री राम नवमीच्या शोभायात्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे. रामनवमीनिमित्ताने श्रीराम नवमी समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच विविध संघटनाद्वारे रामनवमी उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली. शोभायात्रेत बालवृद्धांचा सहभाग, चिमुकल्यांनी धारण केलेली श्रीराम, सीता, लक्ष्मणाची वेशभूषा व चौकाचौकात घुमणारा प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष व फटाक्यांची आतषबाजी यामुळे चंद्रपूर शहर दणाणून गेले होते.

आज देशात श्रीराम नवमीचा उत्साह आहे. सर्वत्र उत्साहात राम नवमी साजरी होत आहे. यंदाची राम नवमी देशासाठी खास आहे. कारण अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी आहे. शेकडो वर्षानंतर देशवासियांच राम मंदिराच स्वप्न साकार झालं. आजच्या या पवित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर ऐतिहासिक शहरात श्रीराम काळा मंदिर येथून मिरवणूक सुरु झाल्यानंतर लक्षवेधक आतषबाजी करण्यात आली.

रामनवमी उत्सवानिमित्त रस्त्यांच्या भागात करण्यात आलेल्या केशरी विद्युत रोषणाईच्या पार्श्वभूमीवर होणारी आतषबाजी अतिशय नयनरम्य होती. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीच्या वेळी सर्वत्र जय श्रीराम घोषांनी आसमंत दुमदुमला होता. रामनवमीचा उत्साह चंद्रपूर शहरातील प्रत्येक भागात अनुभवास येत होता. ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’, राम जी कि निकाली सवारी, आज राम आयेंगे, आदी भक्तिगीतांच्या तालावर तरुणाई बेधुंद नाचत होती. अनेक भागांमध्ये आकर्षक देखावे करण्यात आली होती. भव्य मिरवणूक, त्यामुळे चैतन्यमय वातावरण झाले होते. रस्त्यांवर ओसांडलेला जनसमुदाय…श्रीराम काळा मंदिर संस्थान आणि चिमुकले राम मंदिरात रामनामाच्या आराधनेत भारावलेले भाविक…परिसरातील रस्त्यांवर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

‘सियावर रामचंद्र की जय…’ ‘प्रभू श्री राम की जय’, ‘श्रीराम चंद्रांचा जयजयकार’ अशा जयघोषांनी चंद्रपूर दुमदुमले. राम, लक्ष्मण आणि सीतेची झांकी, पालखी ग्रुपचे ढोल पथक लक्ष वेधून घेत होते. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आ. किशोर जोरगेवार, सपना सुधीर मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, राजीव कक्कड,डॉ.मंगेश गुलवाडे, रुद्रनारायण तिवारी,सैयद साजिद, सचिन कोतपल्लीवार, सुरज पेदुलवार, रणजित डवरे, सुशांत शर्मा, राजेश यादव यांच्यासह अनेक सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. ठिकठिकाणी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे सपत्नीक स्वागत करण्यात आले. अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती – सुधीर मुनगंटीवार

“भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो”धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी 450 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

Thu Apr 18 , 2024
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण 450 मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूकीचे कामकाज देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com