मुंबई :- केंद्रीय अन्वेषण विभागाने 11.05.2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून रायगड (महाराष्ट्र) येथील खाजगी कंपनी, तिचे संचालक/ हमीदार तसेच मुंबई स्थित एक खाजगी कंपनी आणि अज्ञात सरकारी कर्मचारी तसेच अज्ञात व्यक्तींविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर पाच कन्सोर्टियम सदस्य बँकांचे 1017.93 कोटी रुपयांचे (अंदाजे) नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवला आहे. आरोपींनी 2012 ते 2017 या कालावधीत सुमारे 812.07 कोटी रुपये इतके खेळते भांडवल, मुदत कर्ज आणि एनएफबीचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँका म्हणजेच बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची फसवणूक करण्याचा कट रचला. तसेच आरोपींनी कट रचून एसबीआय आणि इतर 5 कन्सोर्टियम सदस्य बँकांना काल्पनिक विक्री/ खरेदी व्यवहार करून फसवले तसेच खात्यांमध्ये गैरव्यवहार केले आणि थकित कर्जाचा भरणा न केल्याने सुमारे 1017.93 कोटी रुपये (अंदाजे) निधी देखील लुटला, असा आरोपही करण्यात आला.
या प्रकरणी दिल्ली, मुंबई, रायगड आणि ठाणे (महाराष्ट्र) यासह 9 ठिकाणी आरोपींच्या निवासस्थानी आणि अधिकृत जागेवर छापे टाकण्यात आले आणि दोषी दस्तावेज / सामग्री जप्त करण्यात आली.
या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.