नागपूर :- थकीत वीज बिलाच्या वसुलीकरिता गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचा-याला अश्लील शिविगाळ करित मारहाण करुन जिवानिशि मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचपावली महेंद्रनगर येथील रहिवासी मोहम्मद असद अब्दुल वाहाब कुरैशी याचेविरोधात कपिल्नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी की, महावितरणच्या शारदा नगर शाखा कार्यालयात मुख्य यंत्रचालक म्हणून कार्यरत सत्यभामा कृष्णाजी वानखेडे या त्यांचे सहकारी बाह्य स्त्रोत कर्मचारी धिरज वानखेडे याचेसोबत गुरुवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 8.50 च्या सुमारास 12 हजार रुपयांची थकबाकी वसुली करिता आरोपीच्या महेंद्रनगर, पाचपावली येथील घरी गेल्या असता आरोपीने या कर्मचा-यांसोबत वाद घातला. या घटनेची माहिती कार्यालयात देण्यासाठी फ़िर्यादी सत्यभामा वानखेडे व धिरज वानखेडे जात असतांना आरोपी मोहम्मद असद अब्दुल वाहाब कुरैशी याने यशोदिप कॉलनी रोड येथे फ़िर्यादीची गाडी अडवून धीरजची गच्ची पकडली व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली, आरोपीस रोकण्यासाठी फ़िर्यादी गेल्या असता आरोपीने फ़िर्यादीची देखिल गच्ची पकडून अश्लील शिवीगाळ करीत भिंतीवर ढकलले. याबाबत जाब विचारला असता आरोपीने परत शिविगाळ करीत परत या भागात दिसलात तर जिवानिशी मारू अशी धमकी देत तिथून पळाला.
याप्रकरणी शासकीय कामात अडथळा, अश्लिल शिविगाळ आणि जिवानिशी मारण्याची धमकी दिल्याबद्दल फिर्यादी सत्यभामा कृष्णाजी वानखेडे यांनी आरोपी मोहम्मद असद अब्दुल वाहाब कुरैशी याचेविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, आरोपीविरोधात पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 221,132,126 (2),296,351(3) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वीज मीटर फ़ोडणा-याविरोधात अदखलपात्र गुन्हा
गुरुवार दि. 27 मार्च रोजी दुपारी 12 च्या सुमारास महावितरणच्या नारा शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता ब्रिजेश कुमार जगदीश यादव हे त्यांचे सहकारी नितीन कोल्हटकर यांचेसोबत जात असतांना हितक्षशिलानगर, नारा रोड निवासी हिरामल के, दोरसेटवार याने नितीन कोल्हटकर याचे हातातील वीज मीटर हिसकावून ते फ़ोडून मीटर्चे नुकसान करीत ब्रिजेश कुमार जगदीश यादव व त्यांच्या सहका-याला शिवीगाळ केली. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात ब्रिजेश कुमार जगदीश यादव यांनी केलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 352,324(4) अन्वये अदखलपातर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयात जाण्याची समज देण्यात आली आहे.