नागपूर :- वीजबिलापोटी असलेली थकबाकी वसुल करण्यास गेलेल्या महावितरणच्या अमोल शेळके या बाह्यस्त्रोत कर्मचा-याला मारहाण आणि शिवीगाळ करणा-या ईश्वर धिरडे या ग्राहकाविरोधात सक्करदरा पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरणचे बाह्यस्त्रोत कर्मचाह्री अमोल शेळके हे सोमवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी सक्करदरा लेक गार्डन जवळील वीज ग्राहक ईश्वर धिरडे यांच्या घरी वीजबिलाची वसुली करण्यास गेले असता आवाज देऊन देखील ग्राहकाने प्रतिसाद दिला नसल्याने अमोल शेळके यांनी ग्राहका कडील विज पुरवठा खंडित करण्यासाठी मीटरचे टर्मिनल बॉक्स उघडत होते, यावेळी ईश्वर धिरडे यांनी वीजपुरवठा खंडित करण्यास मज्जाव करतांना अमोल यास शिविगाळ करीत मारहाण केली आणि त्याचा मोबाईल आपटून फ़ोडला, सदर प्रकरणी अमोल शेळके याच्या तक्रारीच्या अनुषंगाने ईश्वर धिरडे या ग्राहकाविरोधात सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 115(2), 352 व 324 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून सक्करदरा पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.