मुंबई :- राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता एकत्रित २ हजार २ उमेदवारांना नियुक्ती पत्रप्रदान करणे सोयीचे नसल्याने, मुंबई तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी १० उमेदवारांना पालकमंत्री यांच्या हस्ते तर, २ व ३ मे रोजी नियुक्ती प्राधिकारी यांच्या हस्ते उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.
शासनाद्वारे आयोजित विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. महसूल विभागातील भूकरमापक (गट क) या पदाच्या 1,268 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. तर, मराठी भाषा विभागातील सहायक भाषासंचालक (गट ब) पदासाठी एक उमेदवार, औषधी द्रव्ये (गट ब) वैज्ञानिक अधिकारी या पदाचे 5 उमेदवार, राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट क) या पदाचे 114 उमेदवार, परिवहन विभागातील सहायक मोटर वाहन निरीक्षक(गट क) या पदाचे 177 उमेदवार, वित्त विभागातील राज्यकर निरीक्षक (गट क) 697 उमेदवार, विधि व न्याय विभागातील अवर सचिव (गट अ) या पदाचे 11 उमेदवार,सार्वजनिक आरोग्य विभागातील (गट अ) पदाच्या 224 उमेदवार अशा एकूण 2002 उमेदवारांना करगदपत्रांची पडताळणी करुन नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.