जामखेड शहराचा जुना प्रारुप विकास आराखडा रद्द करा आणि नवा आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

• विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई :- जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात झालेल्या बैठकी दरम्यान दिले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, नगररचना संचालक डॉ. प्रतिभा भदाणे, प्रा. मधुकर राळेभात, अँड. प्रविण सानप, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, राहुल अंकुश उगले, शहाजी रामचंद्र राजेभोसले, विनायक राऊत, अविनाश साळुंके, यांच्यासह जामखेडमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, सहाय्यक नगर रचना संचालक हेही दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जामखेड शहराच्या प्रारुप विकास आराखड्याची घोषणा 26 डिसेंबर 2018 रोजी झाली. त्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले व प्रारुप विकास आराखड्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या प्रारुप आराखड्यास जामखेडमधून 614 हरकती व सूचना प्राप्त झाल्या. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन यासंदर्भात प्रा. राम शिंदे यांनी या बैठकीचे आयोजन केले.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जामखेड शहराचा प्रारुप विकास आराखडा तयार करून अनेक वर्षे झाली आहेत. या आराखड्यावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हरकती आहेत. जामखेड शहर आता वाढले असून यापूर्वीच्या विकास आराखड्यातील रिंगरोड व इतर रस्ते हे शहरामध्ये आले आहेत. त्यामुळे जुना प्रारुप आराखडा रद्द करून नव्याने सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. नव्या आराखड्यात रिंगरोड तसेच इतर रस्त्यांचे रुंदीकरणाचा समावेश करावा.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जामखेड शहराचा प्रारुप विकास आराखड्यावर सहाशेहून अधिक सूचना आल्या आहेत. त्यामुळे या हरकती व सूचनांचा अभ्यास करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करावे. जुन्या प्रारुप आराखड्यातील चुका दुरुस्त करून नव्याने प्रारुप विकास आराखडा तयार करताना त्यामध्ये पारदर्शकता असावीच. तसेच विकास आराखडा तयार करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधानसभा प्रश्नोत्तर : रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू - राज्यमंत्री योगेश कदम

Tue Mar 18 , 2025
मुंबई :- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून नागपूर येथे जाणारा ३० टन रेशनचा तांदूळ पोलिसांनी ट्रकसह जप्त केला. या जप्त मालासंदर्भात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गृह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!