नवी दिल्ली :- देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत अशा अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने, सार्वजनिक प्रशासनातील पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार योजना सुरू केली आहे. वर्ष 2023 साठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कार योजनेत सुधारणा करून, त्यात जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात सनदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा, विविध श्रेणी अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.
श्रेणी एक मध्ये 12 प्राधान्य क्षेत्र योजनेअंतर्गत, जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत 10 पुरस्कार प्रदान केले जातील.
श्रेणी 2 मध्ये केंद्रीय मंत्रालये/विभाग, राज्ये, जिल्हे यांच्यासाठी अभिनव कल्पना मांडणे – या श्रेणीअंतर्गत सहा पुरस्कार दिले जातील.
पंतप्रधान पुरस्कार वेब पोर्टलवर नोंदणी आणि नामांकने सादर करण्यासाठी 3 जानेवारी 2024 रोजी नोंदणी सुरू झाली असून, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक, तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 दिली आहे.
या योजनेत व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने एक लोकसंपर्क मोहीम हाती घेतली असून, https://pmawards.gov.in वर सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार 2023 साठी वेब पोर्टलवर नामांकने सादर करण्याची सूचना केली आहे.
सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 चे स्वरूप, चषक, मानपत्र आणि 5 लाख रुपये रोख रक्कम असे असेल. प्रकल्प/कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी किंवा सार्वजनिक कल्याणाच्या कोणत्याही क्षेत्रातील संसाधनांची कमतरता भरून काढण्यासाठी पुरस्कृत जिल्हा/संस्थेला 20 लाख रुपये दिले जातील. नागरी सेवा दिनानिमित्त, पंतप्रधानांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.