मुंबई :- “जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी राज्यशासन प्रयत्नशील असून कुशल आणि रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरं नक्कीच मोलाची भूमिका बजावतील”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराला ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार जे. पी. नड्डा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड. आशिष शेलार, आमदार मनीषा कायंदे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आणि आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “युवा पिढीच्या ताकदीवर देश महाशक्तीकडे वाटचाल करतोय, यामुळेच संपूर्ण जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सध्या देशात जी २० च्या बैठका सुरु आहेत. जी २०चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळेच युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे.”
“नव्या पिढीने परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पाऊले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करण्याचा तसेच सरकारच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना लागणारे शिक्षण, तसेच शिक्षणासाठी देण्यात येणारे अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती तसेच रोजगाराच्या विविध संधी याची माहिती तसेच पालकांचे समुपदेशन या शिबिरात केले जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना राज्यात ७५ हजार नोकऱ्या देण्याचे शासनाचे उदिृष्ट आहे. बार्टी, सारथी व महाज्योती या माध्यमातून शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १ लाख २५ हजार रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध संस्थांसोबत करार करण्यात आले आहेत. आगामी काळात तीन लाख रोजगार निर्माण करण्यात येतील. मुंबई महापालिका शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच महापालिकेच्या १०० शाळांमध्ये कौशल्ययुक्त शिक्षण मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
युवा पिढीने कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वनीचित्रफित माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर मार्गदर्शन आज राज्यातील सर्व मतदारसंघात आयोजित केले आहे.या मार्गदर्शन शिबिराचा युवक व युवतींना नक्की फायदा होईल. या शिबिरात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचीही एकत्रित माहिती मिळेल. पालकांनाही या शिबिराच्या माध्यमातून एक दिशा मिळेल. बदलत्या काळानुसार युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
औद्योगिक क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन शिक्षण घ्यावे – खासदार जे. पी. नड्डा
खासदार जे.पी. नड्डा म्हणाले की, आज औद्योगिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे. पुरवठादारास औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदल आणि तशी मागणी कळत नाही, त्यामुळे मागणी करणाऱ्याला काय हवे ते जाणून घ्या. तांत्रिक शिक्षण गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होत रहावे लागेल. १० लाख रोजगार देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. २ लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रधानमंत्री यांनी दिले आहेत. १३ लाखांहून अधिक जणांना प्रशिक्षण दिले आहे. देशात कुशल मनुष्यबळाची गरज होती हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली.
खासदार नड्डा म्हणाले की, प्रधानमंत्री यांनी स्वप्नं पहिले आणि ‘स्किल इंडिया मिशन’ सुरु झाले. युवा पिढी प्रशिक्षित होताना पुन:प्रशिक्षण गरजेचे आहे. पुन:प्रशिक्षणानंतर पुन्हा अद्ययावत होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण दिलेल्या उमेदवारांत ६६ टक्के महिलांचा समावेश असून, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत एक कोटींहून अधिक उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचा कार्यक्रम राबवला. स्टार्ट अप मध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. ५०० कोटी रुपये इको सिस्टीम तयार करण्यासाठी तरतूद केली आहे, त्यासाठी नड्डा यांनी राज्य शासनाचे कौतुक केले.
राज्यात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार
– कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा
कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, असा प्रश्न असतो तसेच कोणत्या क्षेत्रात आपल्याला कौशल्य प्राप्त करावे लागेल, याबाबत साशंकता असते विद्यार्थ्यांशी संवाद वाढून त्यांना योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन मिळाले तर चांगले रोजगार मिळण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन राज्यभरात २८८ मतदारसंघात असे रोजगार मिळावे आयोजित केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहितीही लोढा यांनी दिली.
मान्यवरांनी केले व्यवसाय समुपदेशन
‘प्रेरणादायी मार्गदर्शन’ याविषयी मार्गदर्शक डॉ.दिनेश गुप्ता, ‘रोजगाराच्या विविध संधी’ या विषयी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले, ‘करिअर कसे निवडावे’ या विषयी प्रिया सावंत, ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयी सुचिता सुर्वे तसेच ‘स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन’ संतोष रोकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध ३८ विविध संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर स्टॉल लावले होते.