नागपूर :- अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प महिला, युवा, शेती, शिक्षण आणि आरोग्य यंत्रणेला बळकटी देणारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देण्याचा निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे दुरगामी पाऊल ठरणार आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना पीकविमा देणारी योजना पुढे सुरु ठेवून सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ करून शेतकऱ्यांना मोठी भेट सरकारने दिली आहे. व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक अभ्यासाठी प्रवेशीत 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची योजना म्हणजे खऱ्या अर्थाने ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ला न्याय देणारी आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जाहीर राज्यातील तरुण- तरुणींच्या स्वप्नांना बळ देईल, असेही संदीप जोशी यांनी नमूद केले.