नागपूर :- देशातील वंचित घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी मांडला आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली हाताने मैला साफ करण्याची पद्धत बंद करून मशीनद्वारे स्वच्छता कार्य करण्याची संकल्पना मांडून वंचित घटकांच्या कार्याचा सन्मान अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
देशातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यास शिष्यवृत्तीचे प्रावधान नव्हते. मात्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अभिमत विद्यापीठात शिक्षण घेणा-या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ॲड. मेश्राम यांनी आभार मानले.
सर्वजनहिताय व सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प असल्याचे सांगताना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले की, समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा त्याचप्रमाणे शेतकरी, छोटे उद्योजक, व्यापारी, नोकरदार, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी प्रावधान करत त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा अर्थसंकल्प आहे.