नागपूर :- राज्यातील शेतकरी, महिला, युवा या शक्तीला बळ देऊन प्रगतिशील महाराष्ट्राला दिशा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.
शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा देण्याची योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना कायम ठेवून सरकारने शेती आणि शेतकरी दोघांनाही बळ दिले आहे. गाव तिथे गोदाम योजना शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या संरक्षणाची हमीच आहे. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची योजना म्हणजे वास्तवदर्शी संवेदनशील सरकारचे सर्वसमावेशक धोरण अधोरेखित करीत आहे. राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकारने कटिबद्धता दाखवून अभियांत्रिकी, वास्तूशास्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक अभ्यासासाठी प्रवेशीत 8 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणशुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा ही अत्यंत अभिनंदनीय आहे. या योजनेमुळे अनेक मुलींना विविध क्षेत्रात ध्येय साध्य करता येणार आहे. तरुणांना प्रशिक्षणातून रोजगाराभिमुख बनविण्याची संकल्पना प्रगतिशील महाराष्ट्राला मोठी ताकद देणार आहे, असेही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम म्हणाले.