नागपूर :- काल लखनऊ येथे बसपाची राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत बहन मायावती यांनी आकाशआनंद यांच्यावर राष्ट्रीय समन्वयक व उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली.
आज सकाळी बहन मायावती यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड. परमेश्वर गोणारे यांच्याशी महाराष्ट्रातील घडामोडी व संघटन बांधणीवर चर्चा केली. प्रदेश कार्यकारणीत आपसी ताळमेळ नसल्याचे प्रदेशाध्यक्षांनी लक्षात आणून दिल्याने पक्षाचे हित लक्षात घेऊन बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांनी महाराष्ट्र प्रदेश बसपाची कार्यकारिणी बरखास्त केली.
बहन मायावती स्वतः महाराष्ट्राकडे लक्ष देतील व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लगेच नव्याने राज्य कार्यकारणी बनवतील. ही कार्यकारिणी 4 डिसेंबर 2023 रोजी बनली असून यात 15 पदाधिकारी होते.
यापूर्वीच्या विलास गरुड, संदीप ताजने यांच्या नेतृत्वातील कार्यकारण्या बरखास्त झाल्या त्यावेळी जुन्याच प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारीण्या बनविण्यात आल्या होत्या. हल्ली महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी म्हणून खासदार रामजी गौतम यांच्यावरच जबाबदारी आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.