
नागपूर :- नागपूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या प्रसारण विभागाच्या संचालक वृंदा देसाई आज नागपूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी रामटेक येथील बादली तसेच कामठी येथील दिघोरी या गावांमध्ये भेट देऊन विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून या यात्रेचा आढावा घेतला याप्रसंगी त्यांनी कीटनाशक तसेच खत फवारणीसाठीचे ड्रोनचे प्रात्यक्षिक सुद्धा बघितले.
नागपूर शहर तसेच जिल्ह्यात विविध प्रचार वाहनाद्वारे विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत केंद्रीय तसेच राज्य शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येत असून या प्रचार वाहनांभोवती ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी करून विविध योजनांच्याविषयी माहिती घेत आहेत. या संकल्प यात्रेच्या दरम्यान आयोजित मृदा परीक्षण चाचणी, आयुष्मान भारत योजना कार्ड शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्रीय योजनांची माहिती पुस्तिका अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून या यात्रेला नागपूर जिल्ह्यात भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
या दौऱ्याप्रसंगी पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशिन राय तसेच या अभियानातील नागपूर ग्रामीणचे नोडल अधिकारी उपस्थित होते.


