– पालक सचिवांकडून विविध बाबींचा आढावा
यवतमाळ :- केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजना गावपातळीपर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा आरोग्य विभागाचे प्रधान सचिव एन.नवीन सोना यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी विविध विकासात्मक बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी सुहास गाडे, विशाल खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे तसेच सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
पालक सचिव एन.नवीन सोना यांनी जिल्ह्यातीत रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्य, कृषी कर्ज, कापूस व सोयाबीन खरेदी, जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात येणारी कामे, जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तसेच सर्व विभागांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यात केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या प्रत्येक विभागांच्या प्रमुख योजना गावपातळीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. लोकांच्या अडचणी दुर करा. लोकांच्या अडचणी म्हणजे शासनाच्या अडचणी आहे. प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या मिळतील यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले.
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली तसेच अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली.