– मनपास्तरीय समितीची बैठक संपन्न
चंद्रपूर :- मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ३९३५ लाभार्थ्यांच्या अर्जांना मनपा सभागृहात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मनपास्तरीय समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.
वयोश्री योजनेसाठी आतापर्यंत ५०६२ अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी ११२७ अर्ज वयाची अट पूर्ण न करत असल्याने तसेच कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याकारणाने अपात्र ठरले आहेत. योजनेसाठी समाज कल्याण कार्यालय व चंद्रपूर महानगरपालिकैची सर्व कार्यालये येथे अर्ज सादर करण्याची सुविधा करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या सुविधेसाठी ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या ठिकाणी जाऊन विविध शिबिरे घेऊन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ लवकरच वितरित करण्यात येणार आहे.सदर बैठकीत रमाई आवास योजनेचा सुद्धा आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे तसेच शबरी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.
याप्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त प्रतिभा भागवतकर,समाज विकास अधिकारी सचिन माकोडे उपस्थित होते.