– अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० क्रिकेट स्पर्धा
नागपूर :- शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ टी-२० ‘कुलगुरू चषक’ क्रिकेट स्पर्धेस मंगळवार, दिनांक २६ डिसेंबर २०२३ पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने चौधरी चरणसिंह हरियाणा कृषी विद्यापीठ संघाला एका धावेने पराभूत करीत विजय प्राप्त केला.
सक्करदरा येथील श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या सराव सामन्यामध्ये बोर्ड एकादश संघाने २० शतकात ९ बाद २१५ धावा काढल्या. या धावांचा चांगला पाठलाग करताना हरियाणा कृषी विद्यापीठाच्या संघाने ५ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. मात्र एका धावेने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बोर्ड एकादस संघातील नरेंदंर शिलक यांनी ५ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने २१ चेंडू ५७ धावा काढल्या तर तरुणनेदेखील चांगली साथ देत ३३ चेंडूत ५७ धावा काढल्या. हरियाणा कृषी विद्यापीठाच्या डॉ. विनय अहलावत यांनी सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. या धावांचा पाठलाग करताना हरियाणा कृषी विद्यापीठ हिसारच्या संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. दीपक कुमार यांनी ३१ चेंडूत ४ चौकार २ षटकारासह एकूण ५७ धावा काढल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत सामन्यातील सस्पेन्स कायम होता. अखेर एका धावेने बोर्ड एकादश संघाने हा सामना जिंकला. हिसार विद्यापीठाचे डॉ. विनय अहलावत यांना प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यात आला.