– सकारात्मक ऊर्जेने मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन
नागपूर :- गणेशोत्सवानिमित्त रक्तदान जनजागृती करीत नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे विदर्भ इन्फोटेक प्रा.लिमिटेडचा (व्हीआयपीएल) राजा आयटी पार्क, गायत्री नगर येथे सोमवारी (ता.९) अर्पण ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहरात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्साहाच्या वातावरणात एका सकारात्मक ऊर्जेने मोठ्या संख्येत रक्तदान करा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, मनपा आयुक्त व प्रशासक डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि श्रेयस उगेमुगे यांनी रक्तदान करून अभियानाची सुरुवात केली. यावेळी विदर्भ इन्फोटेक प्रा.लिमिटेडचे प्रमुख प्रशांत उगेमुगे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे, मनपा जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.
शहरात रक्ताचा जाणवणारा तुटवडा भरुन काढण्यासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्व गणेश मंडळांनी देखील आपल्या गणपती मंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. रक्तदान शिबिरांच्या आयोजनाबाबत गणपती मंडळांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्हीआयपीएल चा राजा आयटी पार्क, गायत्री नगर येथे जवळपास १०० नागरिकांनी रक्तदान केले. इतर मंडळांना रक्तदान शिबिराकरिता आवश्यक सुविधा नागपूर महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. एक सकारात्मक पाऊल म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करा आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असेही आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मनपा, जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाद्वारे संयुक्तरित्या सार्वजनिक गणेश मंडळांनी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी सर्व गणपती मंडळांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. व्हीआयपीएल चा राजा आयटी पार्क, गायत्री नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी रक्तदान करून नागरिकांना प्रोत्साहित केले. प्रत्येक गणेश मंडळांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जेणे करून सामाजिक मदत होईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकांमधे एक चांगला संदेश जावा यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सामील व्हा, जे शारीरिकरित्या स्वस्थ आहेत, त्यांनी अवश्य रक्तदान करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांनी केले.
नागपूरमध्ये विदर्भासह मध्य भारतातून अनेक ठिकाणांहून वैद्यकीय उपचार घ्यायला रुग्ण येत असतात. अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. अनेकवेळा रक्ताचा तुटवडा असतो. त्या अनुषंगाने पर्यावरणपूरक गणोशोत्सवासोबत आपण एक सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम राबवतो आहोत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर म्हणाले. नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून ४००० यूनिट रक्ताचे टार्गेट ठेवले आहे. तसेच रक्तदान शिबिर हे शासकीय कार्यालयांमध्ये देखील राबविण्यात येणार आहे. त्यामळे नागपूरमध्ये कोणत्याही गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्णाला, सिकलसेल किंवा कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमतरता भासणार नाही, यासाठी हा महत्वाचा प्रयत्न आहे. गणपती मंडळांनी साथ दिली तर ४००० यूनिट रक्ताचे लक्ष्य नक्की पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डॉ.जयश्री बानाईत ,डॉ. त्रिलोक ,दीपाली नासरे आणि अर्पण ब्लड बँकचे प्रतिनिधी उपस्थित होते .