– राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार
मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचेही दानवे यांनी नमूद केले.
यावेळी दानवे म्हणाले की, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ. श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे –
जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, कृषी क्षेत्र संपर्क – खा. अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मीडिया- आ.अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया – आ. निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या.महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत.
विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ही दानवे यांनी नमूद केले. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.