शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्याबरोबरच आपत्तीच्या काळात त्यांना भरीव मदत करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन आणि प्रबोधन करण्यात येत आहे. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतक-यांच्या विकासासाठी “कृषी समृद्धी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतीपूरक उद्योग, महिला व शेतकरी समूह गट तयार करणे, लघु व सूक्ष्म उद्योग निर्मिती, मार्केट लिंकेज, कुक्कटपालन, मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम, दुग्धव्यवसाय तसेच रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदींचा त्यात समावेश करण्यात आला असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतमालाला हमीभाव, पीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, तसेच अल्पमुदत कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री  देसाई यांनी सांगितले.

चालू हंगामातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने व २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत ६ हजार ४१७ कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार ९०१ बाधित शेतकऱ्यांना रू.५५१.२१ कोटी रुपये एवढे निविष्ठा अनुदान मंजूर झाले असून ५५१.२१ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी रू.४७७ कोटी ६७ लाख निधी प्रत्यक्ष खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपुरुष अटल' महानाट्यातून अटलजींचा जीवनपट जगासमोर येणार  - मंत्री चंद्रकांत पाटील

Wed Dec 28 , 2022
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आयोजन नागपूर : ‘राष्ट्रपुरुष अटल’ या महानाट्यातून माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या महान कर्तृत्व,नेतृत्वाचा आणि समर्पित देशसेवेचा संदेश जगासमोर येणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आज येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘राष्ट्रपुरुष अटल’ या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com