‘खरा तो एकची धर्म’ मधून सर्वांना आपले म्हणून वागणूक देणाचा संदेश : महापौर दयाशंकर तिवारी

– साने गुरूजी जयंती निमित्त कार्यक्रम

नागपूर : लहानपणापासून साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना आपण म्हणत आहोत. पुढे बदलत्या काळानुसार या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ कळू लागला. सर्वधर्माचा भाव हा मानव सेवा आहे. धर्म कुठलाही असो प्रत्येकाला आपले समजून त्यांच्याप्रती आपल्या दायित्वाचे निर्वहन करण्याचा संदेश साने गुरूजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेतून येतो, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

साने गुरूजी यांच्या १२१व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिका आणि सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्रवारी (ता.२४) पंचशील टॉकीज चौकातील टिळक पत्रकार भवन सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, मनपाच्या गलिच्छ वस्ती व घरबांधणी समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, दुर्बल घटक समिती सभापती कांता रारोकर, स्वातंत्र्य संग्रामाच्या साक्षीदार लीलाताई चितळे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष मनोहर खर्चे, उपाध्यक्ष मनोहर तांबुलकर, वसंत पाटील, सुरेश रेवतकर, वासुदेव वाकोडीकर, मनोहर तुपकरी, मधुकर पाठक, अनिल आकरे, भगवान टिचकुले, विजय दीक्षित, प्रमिला राउत, माधुरी भुजाडे, गीता महाकाळकर, प्रकाश इतलावतकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी साने गुरूजींच्या जीवन चरीत्राचा गौरव केला. विपरीत परिस्थितीमध्ये साने गुरूजींनी ‘शामची आई’ हे पुस्तक लिहीले. ‘शामची आई’मधून प्रत्येक पिढ्यांना जीवनात करावयाच्या उत्तम कार्याची प्रेरणा मिळते. साने गुरूजींचा सन्मान करण्यासाठी सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीकने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.

नागपूर शहरातील आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी विविध क्षेत्रातून आपला देश, राज्य आणि आपल्या शहराची सेवा केली. त्यांना आता कुठल्याही कामासाठी त्रास होउ नये या उद्देशाने त्यांच्या सहकार्यासाठी मनपा मुख्यालयात महापौर कार्यालयामध्ये ‘ज्येष्ठ नागरिक कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. आपल्या शहरासाठी आयुष्यभर सेवा देणा-यांना सन्मान देण्याचा प्रयत्न प्रत्येकवेळी मनपातर्फे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनपामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आल्याबद्दल सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीकतर्फे यावेळी महापौरांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमामध्ये प्रारंभी साने गुरूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुदायीकरित्या ‘खरा तो एकची धर्म’ ही जागतिक प्रार्थना म्हणण्यात आली. मनपा शाळेतील शिक्षिकांनी ‘खरा तो एकची धर्म’चे सादरीकरण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ज्येष्ठ स्मरणिका २०२२’चे विमोचन करण्यात आले.

साने गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत सोनाली गुमगावकर यांना प्रथम, स्मीता पाठक यांना द्वितीय आणि वैशाली तुपकर यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. किल्ले स्पर्धेमध्ये मंदार उट्टलवार यांना प्रथम क्रमांक, रुघवेंद्र तराळे यांनी द्वितीय व सान्वी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. कोव्हिड काळात सामाजिक कार्य करणा-या ज्येष्ठांना रोख पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरवान्वित करण्यात आले. अंश तुपकरी या चिमुकल्याने साने गुरूजी यांचे उत्कृष्ट तैलचित्र रेखाटले. याबद्दल त्याला प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन सीनियर सिटीझन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रीकचे सचिव सुरेश रेवतकर यांनी केले. आभार सदस्या प्रमिला राउत यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वाढती रुग्णसंख्या,आरोग्य सुविधांचा अभाव

Sat Dec 25 , 2021
–मनपाने घेतली शहराच्या सुरक्षित आरोग्याची जबाबदारी सरत्या वर्षात कोरोना काळातील कार्याने दिले आरोग्य यंत्रणेला बळ नागपूर : २०२१ हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने नावडते ठरले. फेब्रुवारी अखेरपासून वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यातून हिरावलेले अनेकांचे नातलग या सरत्या वर्षाने एक कटू आठवण म्हणून नोंदविली गेली आहे. या सर्व परिस्थितीत शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महानगरपालिकेने नागपूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व शर्थीचे प्रयत्न करून शहरातील नागरिकांना कोरोना संसर्गाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com