– भाजपच्या स्थापनादिनी पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन
नागपूर :- भाजप हा विचाराधिष्ठित पक्ष आहे. कुण्या एका परिवाराचा पक्ष नाही. असंख्य कार्यकर्त्यांचे बलिदान आणि समर्पणातून आज भाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरलेला आहे. सुशासन आणि विकास हेच आपले उद्दिष्ट आहे. समाजातील शेवटच्या माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपण काम करतोय. आज भाजपच्या स्थापना दिनी पक्षाच्या कार्यालयाचे भूमिपूजन झाले. भविष्यात हे कार्यालय सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
भाजपच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून गांधीसागर महाल येथे विदर्भ विभाग, नागपूर महानगर व नागपूर ग्रामीणच्या संयुक्त कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर प्रदेशाध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘आज कार्यालयाचे भूमिपूजन होत असल्याचा मनापासून आनंद आहे. हे कार्यालय भाजपचे घर आहे. कार्यालय उभारण्यामागचा भाव प्रत्येक कार्यकर्त्याने समजून घेतला पाहिजे. आपला पक्ष आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा या परिवाराचा महत्त्वाचा सदस्य आहे. आपल्या मुलाप्रमाणे कार्यकर्त्यांवर प्रेम करणे आणि त्याला गुणदोषांसह स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे. १९५२ पासून आजपर्यंत प्रतिकुल काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे आजचा दिवस उजाडला आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.’
१९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. त्यावेळी देशभर कार्यक्रम झाले. नागपुरात न्यु इंग्लिश हायस्कुलच्या मैगानात शांतीभूषण आणि राम जेठमलानी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी आठवणही ना. गडकरी यांनी सांगितली.
पक्ष कार्यालय हे आपल्या घराप्रमाणे आहे. अनेकांनी त्यासाठी परीश्रम घेतले आहेत. हे केवळ शहराचेच नव्हे तर जिल्हा आणि विदर्भाचे महत्त्वाचे कार्यालय ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.