काँग्रेसची भूमिका सदैव आरक्षणविरोधी भाजपा खासदार विनोद चावडा यांची टीका

– मागास समाजाच्या उन्नती, विकासासाठी मोदी सरकार तत्पर

मुंबई :- राहुल गांधी यांच्या अमेरिका दौ-यातील वक्तव्यावरून आरक्षण विरोधी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेसला मागास व अनुसूचित समाजाची उन्नती नको आहे. पं.जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या काळापासून काँग्रेस केवळ व्होटबँकेच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, अशी टीका भाजपा गुजरात प्रदेश महासचिव खा.विनोद चावडा यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलायात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष शरद कांबळे, सरचिटणीस राहुल कांबळे आदी उपस्थित होते.

चावडा म्हणाले की, इतिहासात डोकावले तर काँग्रेसने नेहमीच आरक्षण धोरणाला विरोध केला आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांच्या विरोधात काम केले आहे. काँग्रेसच्या आरक्षणविरोधी कृतींची यादीच त्यांनी सादर केली. काँग्रेसने नेहमीच अनुसूचित जाती, जनजाती, मागास आरक्षणाला विरोध करत या समाजांच्या हक्कांवर गदा आणली, असे खा. चावडा यांनी नमूद केले.

मोदी सरकार सदैव ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. भाजपा सामाजिक न्यायावर विश्वास ठेवतो. भाजपा कोणाचेही तुष्टीकरण करत नाही असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागास समाजांच्या विकासासाठी, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटत आहे. देशातील आदिवासींच्या कल्याणासाठी पावले उचलण्यात मोदी सरकार तत्पर असून देशाच्या विकासासाठी या समाजाच्या योगदानाचाही ते उचित सन्मान करत आहे असेही खा.चावडा म्हणाले.

खा.चावडा यांनी सांगितले की, काँग्रेसने घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अवमान केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा धार्मिक आरक्षणाला विरोध असताना काँग्रेसने त्यांच्या विचारांचा मान कधीच राखला नाही. डॉ.आंबेडकर यांचा भारतरत्न म्हणून गौरव केला नाही. डॉ.आंबेडकरांचा निवडणुकांमध्ये पराभव करण्यासाठी अनेक प्रयत्न काँग्रेसने केले आहेत. काँग्रेसने अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये एससी,एसटी,ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले. व्होटबँकेचे राजकारण करत काँग्रेसने आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडूमध्ये देखील मुस्लीमांना आरक्षण दिले. ही काँग्रेसची कृती संविधानविरोधी कृती होती असा घणाघात ही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मुस्लीमांना दिले. काँग्रेसने ओबीसी आयोगाला सांविधानिक दर्जा कधीच दिला नाही.1981 मध्ये एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हटवण्यासाठी ‘एएमयू सुधारणा कायदा’ काँग्रेसने आणला, असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुपर 75 योजनेतील विदयार्थ्यांना मिळणार NEET/ JEE /NDA/CA चे धडे 

Sun Sep 22 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शिक्षण विभाग व ACI नागपूर यांच्या सहकार्याने मनपा शाळेत शिक्षण घेणा-या हुशार व होतकरु विदयार्थ्यांना NEET/ JEE /NDA/CA च्या स्पर्धा परीक्षा देता याव्या म्हणुन सुपर 75 योजना सन 2021 पासुन सुरु करण्यात आली आहे. तत्कालीन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून या योजनेची सुरवात करण्यात आली. या योजने अंतर्गत मनपा शाळेतील 75 हुशार व होतकरु विदयार्थ्यांची निवड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com