स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरचा संकल्प : टाऊन हॉल ते फ्रिडम पार्कपर्यंत रॅली
नागपूर : जागतिक उष्णकटिबंधीय आजार दिवसाच्या अनुषंगाने सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीच्या अनुषंगांने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाल येथील मनपा टाऊन हॉल येथून रॅलीला सुरूवात झाली व झिरो माईल फ्रिडम पार्क येथे समापन झाले. रॅलीद्वारे स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूरचा संकल्प करण्यात आला.
फ्रिडम पार्क येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.विनीता जैन, आरोग्य सेवा हिवताप सहायक संचालक डॉ. निमगडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, डब्ल्यूएचओ समन्वयक डॉ. त्रिवेदी, आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे डॉ. गोगुलवार, डॉ. कन्नमवार, डॉ. जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी मोनीका चारमोडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.जास्मीन मुलानी आदी उपस्थित होते.
उष्णकटिबंधीय दुर्लक्षित आजारांमध्ये १९ प्रकारच्या आजारांचा समावेश होतो. ज्याप्रमाणे मलेरिया, टी.बी., एच.आय.व्ही. आणि इतर आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात येते, त्यांच्या तुलनेत तुलनात्मक दृष्टया या दुर्लक्षित आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात येत नाही. करिता त्यांना दुर्लक्षित आजारांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे आजार उष्णकटिबंधीय क्षेत्रात जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्यांना उष्णकटिबंधीय संबोधिले जाते. अस्वच्छता, निरूपयोगी साहित्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे साचलेले पाणी यामध्ये डासोत्पती होऊन डास निर्माण होतात व त्यापासून हे आजार उद्भवतात.
अनेक आजार हे अस्वच्छतेमुळेच उद्भवत असतात त्यामुळे स्वच्छता ही अत्यंत आवश्यक आहे. स्वत:ची, घराची आणि परिसराची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी इतरांकडे बोट दाखविण्यापेक्षा आपण स्वत:पासून सुरूवात करावी, असे आवाहन याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
महाल येथील टाऊन हॉल येथे हिवताप व हत्तीरोग विभागातील सर्व कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना डेंग्यू नियंत्रणाकरीता सर्वेक्षण आणि हत्तीपायाच्या नवीन उपचारापद्धतीबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सेवा हिवताप सहायक संचालक डॉ. निमगडे आणि मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात केली.
जनजागृतीकरिता सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या आजारांबाबत आणि स्वच्छतेबाबत सकाळी प्रार्थना सभेत माहिती देण्यात आली. तसेच सर्व मनपा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये पथनाट्य सादरीकरणास प्रेरित करण्यात आले. त्यापैकी सर्वोत्कृष्ट पथनाट्य सादर करणाऱ्या मनपाच्या डॉ. राममनोहर लोहिया शाळेला प्रथम पुरस्कार मनपा आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांसमोर पथनाट्याचे सादरीकरण केले. मान्यवरांनी जनजागृती करिता आपले लेखी संदेश फलकावर लिहून स्वाक्षरी केली.
प्रास्ताविक मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलाणी यांनी केले. संचालन शुभांगी पोहरे यांनी केले व शेवटी आभार मानले.