भंडारा दि.12 :- भंडारा नगर परिषदेकडून करण्यात येणा-या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलिस अधीक्षक लोहित मतानी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
शहरातील नाशिकनगर भागातील मैत्रेय बुद्ध विहारातील ई- लायब्ररी व मेडीटेशन सेंटरचे लोकार्पण, शहीद स्मारक येथे उद्यानाचे सौंदर्यीकरण, नगर परिषद गांधी विद्यालयाचे भूमिपूजन, खांबतलाव येथील सौंदर्यीकरणाचे उद्घाटन आणि भुयारी गटार योजनेतील कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शहरात नाशिक नगर येथे अनुसूचित जाती उपयोजना अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 1.39 कोटी रुपये खर्च करून ई-लायब्ररी आणि मेडीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. तर शहीद स्मारक येथे अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 3.60 कोटींच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. नगर परिषद गांधी विद्यालय येथे वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत 1.07 कोटीच्या अभ्यासिकेचे बांधकाम व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 3.50 कोटींच्या कामाला मान्यता, खांबतलाव नगर परिषद येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पाच कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत तीन कोटी तर विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एक कोटींच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे उद्घाटन आणि नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेंतर्गत भुयारी गटारी योजनेतील कामासाठी 167 कोटी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील 116 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.