– मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास प्रत्येक पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहणार आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलू उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन सर्वांनी आवर्जुन पहावे, असे आवाहन भारतीय बौध्द परिषदेचे विश्वस्त गुरुप्रसाद मदन यांनी आज केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालयातर्फे चिंचोली शांतीवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयात आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे गुरुप्रसाद मदन यांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य विद्यापीठ महू येथील माजी कुलगरू सी.डि.नाईक, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयाचे कोषाध्यक्ष संजय पाटील, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशिन रॉय, केंद्रिय संचार ब्यूरो चे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे उपस्थित होते. हे छायाचित्र प्रदर्शन 25 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त करून छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास दाखविण्यात आला असून बाबासाहेबांचे कार्य, विविध देशांना दिलेल्या भेटी, नागपुरातील धम्मदिक्षा दिनाचे छायाचित्रसह बाबासाहेबांचे जीवन प्रवास उलगडून दाखविण्यात आला आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी बौध्द अनुयायांनी गर्दी होती.