अनधिकृत नळ जोडणीविरोधात मनपा करणार धडक कारवाई
नागपूर, ता. २७ : नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यू यांच्याद्वारे करण्यात आलेल्या जीआयएस सर्वेक्षणामध्ये आशीनगर झोनमधील बिनाकी-१ कमांड एरियामध्ये २६५९ अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. ऐन उन्हाळ्यात आणि आगामी ईद उत्सवाच्या काळात होणारी अवैधरित्या नळ जोडणी ही गंभीर बाब आहे. अवैध नळ जोडणीचा फटका नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येचा सामना करून बसत आहे. या प्रकारावर गांभीर्याने दखल घेत मनपाद्वारे धडक कारवाई केली जाणार आहे.
आसीनगर झोन मधील बिनाकी-१ कमांड एरियामध्ये असलेल्या अवैध नळ कनेक्शनविरोधात नागपूर महानगरपालिकेने कठोर पाउल उचलले आहे. या भागातील सुमारे २६५९ अवैध नळ कनेक्शन कापण्याबाबत मनपाद्वारे ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने ४ मे, २०२२ पासून विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती जलप्रदाय विभागातर्फे देण्यात आली.
जलप्रदाय विभागानुसार आसीनगर झोनच्या परिसरात प्रवेश नगर, मेहबूबपुरा, योगी अरविंद नगर, हमीद नगर, पांडे वस्ती, संगम नगर, ख्वाजा एसटीडी परिसर, यशोधरा नगर, गरीब नवाज नगर, शिवशक्ती नगर, संजीवनी क्वार्टर, सरोदाबाद, वंसले बस्ती आदी ठिकाणी १५०० पेक्षा जास्त ग्राहकांकडे दुहेरी कनेक्शन आहे. यामध्ये एक कनेक्शन हे कायदेशीर आहे तर दुसरे बेकायदेशीर. उपरोक्त वस्त्यांना दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ यादरम्यान दोन तास पाणीपुरवठा केला जातो. बिनाकी-१ कमांड एरियामध्ये असलेल्या अनधिकृत नळ जोडण्यांमुळे या वस्त्यांमध्ये काही वेळ दुषित पाणीपुरवठा होत असतो काही वेळेनंतर पुन्हा शुध्द पाणी पुरवठा होतो. परिसरातील अनेक भागांमध्ये पाईपलाईनवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अवैध जोडण्यांमुळे दुषित पाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या संपर्कात येउन लोकांना दुषित पाणीपुरवठा होतो आहे. या सर्व बाबींमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकारावर आळा घालण्यासाठी ४ मे पासून अवैध नळ कनेक्शन काढण्याची धडक कारवाई केली जाणार आहे.